औरंगाबाद - स्थायी समितीला कल्पना न देता साडे सात कोटी रुपये खर्च करणारे लेखाधिकारी सुरेश केंद्र यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे सोमवारी झालेल्या सभेत सदस्य आक्रमक झाले. मागील स्थायी समितीच्या सभेत केंद्रे यांच्यावर ठपका ठेवत सभापतींनी त्यांचा समाचार घेतला होता. त्यासोबतच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी दिला होता. मात्र त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे सोमवारी (ता. १०) झालेल्या बैठकीत सदस्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. स्थायी समिती सभापती वैद्य यांनी केंद्रे यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिवांकडे करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
मागील स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी
केंद्रे यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने वैद्य यांनी त्यांचा समाचार घेत
निलंबनाची प्रस्ताव ठेवत अधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना
केल्या होत्या. नगरसेवक बारवाल यांनी सभेच्या सुरवातीलाच हा मुद्दा उपस्थित करत
चौकशीचे काय झाले, असा सवाल केला. स्थायी समितीच्या परवानगीशिवाय परस्पर साडे सात
कोटी खर्च करणे ही गंभीर बाब असल्याचे बारवाल म्हणाले. यावर वैद्य यांनी संबंधीत
अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी संचिका मिळत नसल्याचे
उत्तर दिले. यावर आयुक्तांना चौकशी करीता संचिका देत नाही, हा प्रकार कुणाच्या
जीवावर केला जातो. प्रकरणाची चौकशी करून दोषी असल्यास तत्काळ कारवाई करा अन्यथा
दोन दिवसांनी मुख्यमंत्री आणि सचिवांकडे लेखी तक्रार तसेच त्यांची भेट घेऊन या
प्रकाराबद्दल सांगणार असल्याचा इशारा वैद्य यांनी दिला. प्रशासनाकडून कामे होत
नसल्याबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीला अनुउपस्थित राहाणाऱ्यांना नोटीस
बैठकीत एक मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्या
संबंधीचे अधिकारी उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करीत वैद्य यांनी केंद्रे,
रवींद्र निकम,
एस.एम. जाधव,
शिक्षणाधिकारी
कुलकर्णी यांनी बैठकीला अनुपस्थित असल्याबाबत कळवले असून,
जे अधिकारी न
कळवता बैठकीला उपस्थित नाही त्यांना नोटीस बजावण्याचे
सांगितले.










